चेन्नई - एम. एम चिदंबरम येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचे, विजयाचे श्रेय संपूर्ण भारतीय संघाला जाते. त्यांनी आम्हाला तिन्ही आघाड्यावर पराभूत केले, अशी प्रतिक्रिया इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुटने दिली. भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा ३१७ धावांनी पराभव करत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे.
इंग्लंड संघाच्या पराभवावर जो रूट म्हणाला, 'विजयाचे श्रेय संपूर्ण भारतीय संघाला जाते. त्यांनी आम्हाला तिन्ही आघाड्यावर पराभूत केले. या पराभवातून आम्हाला शिकण्यासाठी खूप आहे. आम्ही अशा वातावरणात खेळत आहोत की, जिथे फिरकी गोलंदाजांना फायदा मिळतो. अशा खेळपट्टीवर आम्हाला धावा करण्याचा मार्ग शोधावा लागेल.'
आमच्या गोलंदाजांनी अशा खेळपट्टीवर, फलंदाजांवर दबाव निर्माण करणे शिकायला हवे. तसेच त्यांना एकाच फलंदाजांला सहा चेंडू खेळण्यासाठी भाग पाडावे लागेल. पहिल्या दिवशी आम्ही चांगली गोलंदाजी करत भारताला सहजासहजी धावा करू दिल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी चेपॉकच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण होते, असे देखील रुट म्हणाला.