दुबई - न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया संघातील टी-२० मालिका नुकतीच पार पडली. यानंतर बुधवारी (१० मार्च) आयसीसीने ताजी टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे. या ताज्या क्रमवारीत, भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत ३-२ अशा फरकाने पराभव झाला. यामुळे ऑस्ट्रेलिया संघाची क्रमवारीत घसरण झाली असून ते तिसऱ्या स्थानी घसरले आहेत. याचा फायदा भारतीय संघाला झाला असून भारत तिसऱ्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. सध्या भारताचे २६८ गुण आहेत. तर ऑस्ट्रेलियाचे २६७ गुण आहेत. त्याचबरोबर २७५ गुणांसह इंग्लंड अव्वल क्रमांकावर आहे. इंग्लंडचा संघ सात गुणांनी भारतापुढे आहे. क्रमवारीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे पाकिस्तान आणि न्यूझीलंड आहे.
भारताला टी-२० क्रमवारीत पहिले स्थान काबीज करण्याची संधी?
भारत-इंग्लंड यांच्यात १२ मार्चपासून पाच सामन्याच्या टी-२० मालिकेला सुरूवात होणार आहे. भारतीय संघाने या मालिकेत मोठा विजय मिळवला तर क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याची संधी भारताला असेल. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ भारताविरुद्ध विजय मिळवत आपले अव्वल स्थान अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करेल.