रांची - भारतीय संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेला पूर्णपणे नेस्तनाबूत करत 'व्हाइटवॉश' दिला. रांचीतील तिसरा सामना भारताने एक डाव आणि २०२ धावांनी जिंकला. या विजयाबरोबर भारतीय संघाने एक मोठा विक्रम मोडला आहे. महत्वाचे म्हणजे, आफ्रिकेचा संघ तब्बल ८४ वर्षांनी पहिल्यांदाच ३-० ने पराभूत झाला आहे.
कसोटी क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघाने 'क्लीन स्वीप' केले आहेत. असा कारनामा करणारा विराट पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय कर्णधाराला आफ्रिकेला क्लीन स्वीप करता आलेले नव्हते. विराट कोहलीने आपल्या नेतृत्वात आफ्रिकेवर तब्बल दोन सामन्यात फॉलो-ऑन लादून डावाने विजय मिळवले. असाही पराक्रम इतर कोणत्याही भारतीय कर्णधाराला करता आलेला नाही. विराट यात अव्वल ठरला आहे.
१९३५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव झाला होता. या मालिकेत आफ्रिका संघ दोन सामन्यात डाव आणि धावा राखून पराभूत झाला होता. त्यानंतर आता भारताने आफ्रिकेविरुध्दचे दोन सामने डाव राखून जिंकले आहेत. दरम्यान, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुध्दचा हा १४ वा कसोटी विजय ठरला आहे. विशेष बाब म्हणजे, भारत सोडून इतर अशियातील संघांची आफ्रिकेविरुध्दची विजयी टोटल १३ इतकी आहे. (सर्वांचे विजय मिळून)