माउंट माउंगनुई - भारतीय संघाने टी-२० मालिकेत न्यूझीलंडचा ५-० ने धुव्वा उडवला. या विजयासह भारतीय संघाने २०२० या वर्षातील मालिका विजयाची घौडदौड कायम राखली आहे. आज (रविवार) माउंट माउंगनुई येथील मैदानात खेळवण्यात आलेल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवला. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका विजयानंतर भारतीय संघाने नोंदवलेले खास विक्रम वाचा -
- भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पाच सामन्यांच्या मालिकेत ५-० निर्भेळ यश मिळवणारा पहिला संघ ठरला आहे.
- भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या मायदेशात तीन किंवा तीनपेक्षा अधिक सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत व्हाइट वॉश देण्याची ही तिसरी वेळ आहे. भारतीय संघाने २०१९ मध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यात विंडीजचा ३-० ने पराभव केला होता. तर २०१५/१६ मध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात ३-० ने धूळ चारली होती. आता भारतीय संघाने न्यूझीलंड संघाचा न्यूझीलंडमध्ये ५-० ने धुव्वा उडवला.
- भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच टी-२० मालिका जिंकली आहे.
- भारत-न्यूझीलंड संघात ५ टी-२० मालिका झाल्या असून यात भारताने दोन तर न्यूझीलंडने ३ मालिकेत बाजी मारली आहे.