कटक -रोहित शर्मा, केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहलीच्या अप्रतिम फलंदाजीमुळे भारताने विंडीजवर कटक येथे सरशी साधली. येथील बाराबती स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने विंडीजला ४ गड्यांनी मात देत मालिकेत २-१ ने बाजी मारली. कर्णधार कोहलीला सामनावीर तर, रोहित शर्माला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
हेही वाचा -चॅपेल म्हणतात, 'कोहली-रोहितपेक्षा सचिन अन् गांगुलीने केलाय घातक गोलंदाजांचा सामना'
विंडीजच्या ३१५ धावांचा पाठलाग करताना भारताने १२२ धावांची दमदार सलामी दिली. हिटमॅन रोहित शर्माने ६३ आणि राहुलने ७७ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर कर्णधार कोहलीने एका बाजूने किल्ला लढवला. या सामन्यात श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि केदार जाधव अपयशी ठरले. हे तिघे बाद झाल्यानंतर, विंडीज आपला पराभवाचा दुष्काळ संपवणार असे वाटू लागले होते.मात्र, अष्टपैलू रविंद्र जडेजा मदतीला धावून आला. कोहली-जडेजाच्या जोडीने संघाचा विजय सुकर केला. कोहलीने ९ चौकारांसह ८५ धावा चोपल्या. तर, जडेजाने ३९ धावांची उपयुक्त खेळी केली. कोहली बाद झाल्यानंतर, मैदानात उतरलेल्या शार्दुल ठाकुरने १७ धावांची झटपट खेळी करत भारताचा विजय निश्चित केला. विंडीजकडून कीमो पॉलने सर्वाधिक ३ तर, कॉटरेल, होल्डर आणि जोसेफ यांना प्रत्येकी एक बळी मिळवता आला. आहे.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. निकोलस पूरन आणि कर्णधार केरॉन पोलार्ड यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर विंडीजने भारतासमोर ५ बाद ३१५ धावांचा डोंगर उभारला. विंडीजच्या सलामीवीरांनी संथ सुरुवात केली. शाय होप आणि एविन लुईस यांनी ५७ धावांची सलामी दिली. रवींद्र जडेजाने लुईसला (२१) बाद करत विंडीजची जोडी फोडली. यानंतर स्थिरावलेल्या शाय होपचा अडथळा मोहम्मद शमीने दूर केला. होपने ५० चेंडूत ४२ धावा केल्या. विंडीजची अवस्था दोन बाद ७० अशी झाली होती. तेव्हा रोस्टन चेस आणि शिमरोन हेटमायरने डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या नवदीप सैनीने हेटमायर आणि रोस्टन चेसला माघारी धाडले. यानंतर निकोलस पूरन आणि कर्णधार केरॉन पोलार्ड यांनी शतकी भागीदारी केली आणि संघाला दोनशेचा टप्पा पार करून दिला. पूरनने यादरम्यान, आपले अर्धशतक पूर्ण केले. शार्दुल ठाकूरने पूरमचा अडथळा दूर केला. पूरनने ६४ चेंडूत ८९ धावांची आक्रमक खेळी केली. दुसऱ्या बाजूने कर्णधार पोलार्डने फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. त्याने अखेरच्या टप्प्यात भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पोलार्डने ५१ चेंडूत ७४ धावांची नाबाद खेळी केली. भारताकडून पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनीने २ तर रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक बळी घेतला आहे.