पुणे -इंग्लंडविरुद्ध मंगळवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना भारताचा खेळाडू श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. आता त्यांच्यावर ऑपरेशन करण्यात येणार आहे. यामुळे तो किमान चार महिन्यांपर्यंत क्रिकेट खेळू शकणार नाही. तो आगामी आयपीएल स्पर्धेलादेखील मुकला आहे. यादरम्यान, अय्यरने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अय्यरने ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे, की 'जेव्हा मोठा धक्का असतो, तेवढेच दमदार पुनरागनही होतं. मी लवकरच पुनरागमन करेन.'
श्रेयसला अशी झाली दुखापत -
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान ही घटना घडली. इंग्लंड डावातील आठव्या षटकात भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोने जोरदार फटका लगावला. हा चेंडू रोखण्यासाठी श्रेयसने हवेत झेप घेतली आणि चेंडू पकडला. यादरम्यान त्याला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला थेट मैदानाबाहेर नेण्यात आले.