लखनौ - दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाने पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताचा ५ गड्यांनी पराभव केला. या विजयासह आफ्रिका संघाने पाच सामन्याची मालिका ४-१ अशा फरकाने जिंकली आहे. भारताने दिलेले १८९ धावांचे माफक लक्ष्य आफ्रिका संघाने बोशच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केले.
अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९.३ षटकात ९ बाद १८८ धावा केल्या. यात कर्णधार मिताली राजने नाबाद ७९ धावाची खेळी साकारली. मितालीने १०४ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकारासह ही खेळी केली. मिताली वगळता अन्य फलंदाज आफ्रिकेचा माऱ्याचा सामना करण्यात अपयशी ठरले. हरमनप्रीतला फलंदाजीदरम्यान, दुखापत झाली. यामुळे तिने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. तिने ३ चौकारांच्या मदतीने ३० धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून नादिन डी क्लर्कने ३, शांगसे आणि तूमी सेखुखुनेने प्रत्येकी २-२ गडी टिपले. कापने १ गडी बाद केला.