हैदराबाद - भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरुद्धचा पहिला टी-२० सामना ६ गडी राखून जिंकला. विडींजने प्रथम फलंदाजी करताना २०७ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने हे लक्ष्य ६ चेंडू राखून सहज पूर्ण केले. यात विराटने नाबाद ९४, तर केएल राहुलने ६२ धावांची खेळी केली. भारतीय संघाने विजय मिळवला असला तरी या सामन्यात भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण गचाळ ठरले. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने भारताच्या क्षेत्ररक्षणावर टीका केली.
वेस्ट इंडीज विरुध्दच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि खुद्द कर्णधार विराट कोहलीकडून 'मिस फिल्डिंग' झाली. याचा फायदा वेस्ट इंडीजच्या फलंदाजी घेतला आणि २०७ धावांचे लक्ष उभारले. भारताच्या क्षेत्ररक्षणावर युवराजने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याने भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण अत्यंत खराब झाल्याची टीका केली.