मुंबई - भारत आणि वेस्ट इंडीज संघात उद्या (बुधवारी ता. ११) मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर तिसरा सामना होणार आहे. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील हा सामना महत्त्वाचा आहे. कारण सध्या दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला आहे. यामुळे दोनही संघ मालिका विजयासाठी मैदानात उतरतील. या सामन्याआधी भारतीय सलामीवीर रोहित शर्माने पत्रकारांशी वार्तालाप केला.
रोहित शर्माने पत्रकारांशी बोलताना सांगितलं, की 'आगामी ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्व करंडक स्पर्धेसाठी आम्ही तयारी करत आहोत, असे मी म्हणणार नाही. कारण विश्व करंडकासाठी अजून बराच अवधी शिल्लक आहे. सध्या संघाचे लक्ष मालिका विजयाचे आहे.'
उभय संघात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. हैदराबाद येथील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला तर दुसरा सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड मैदानात रंगला होता. या सामन्यात वेस्ट इंडीजने सलामीवीर सिमन्सच्या अर्धशतकी खेळीने भारतावर ८ गडी राखून विजय मिळवला. मालिकेचा अखेरचा निर्णायक सामना उद्या ११ डिसेंबरला होणार आहे.