गयाना- भारतीय महिला क्रिकेट संघाने सर्वच आघाड्यावर दमदार कामगिरी करत वेस्ट इंडिज विरुध्दचा तिसरा टी-२० सामना ७ गडी राखून जिंकला. या विजयासह भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजयी आघाडी घेतली. गोलंदाजांची सुरेख कामगिरी आणि जेमिमा रॉड्रिग्जची दमदार फटकेबाजी विजयाच्या जमेच्या बाजू ठरल्या.
भारतीय फिरकीपटूंसमोर वेस्ट इंडीजचा संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद ५९ धावांच करु शकला. त्यानंतर रॉड्रिग्जच्या ५१ चेंडूंतील नाबाद ४० धावांच्या खेळीच्या बळावर भारताने हा सामना ३ फलंदाजांच्या मोबदल्यात आणि २० चेंडू राखून जिंकला.
वेस्ट इंडीजच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. विडिंजची सुरुवात खराब झाली. त्यांची आघाडीची फलंदाज हेली मॅथ्यूज (७), स्टेसी एन. किंग (७) आणि शेमाइल कॅम्पबेल (२) या स्वस्तात तंबूत परतल्या. वेस्ट इंडीजचा संघ ६ षटकांच्या पहिल्या पॉवरप्लेमध्ये फक्त १२ धावाच करू शकला. वेस्ट इंडीजकडून फक्त चेडीन नेशन (११) आणि चिनेली हेन्री (११) याच दोघींना दुहेरी आकडा गाठता आला. आणि वेस्ट इंडीजचा संघ २० षटकात ९ बाद ५९ धावा करु शकला. राधा यादव (२), दीप्ती शर्मा (२), पूनम यादव आणि अनुजा पाटील यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.