हैदराबाद - वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला. भारतीय कर्णधार विराट कोहली या सामन्यात विडींजसाठी कर्दनकाळ ठरला. त्याने या सामन्यात विंडीज गोलंदाजांची पळता भुई केली. या खेळीमुळे विराटवर कौतुकाचा वर्षावही झाला. बॉलिवूडचे 'बिग बी' अमिताभ बच्चन यांनी तर ट्विटरवरून खास डॉयलॉग शेअर करत कोहलीचे अभिनंदन केले.
बिग बी यांनी कोहलीचे कौतुक करताना आपल्याच अभिनयाने नटलेला 'अमर अकबर अँथोनी' या चित्रपटातील एक डायलॉग वापरला होता. 'यार कितनी बार बोला मई तेरे को...की विराट को मत छेड, मत छेड, मत छेड...पन सुनताईचं किधर है तुम...अभी पर्ची लिख के दे दिया ना हाथ में !' देख देख...विंडीज का चेहरा देख. कितना मारा उनको, कितना मारा !' अशा आशयाचे ट्विट बिग बींनी केले आहे.