नवी दिल्ली - भारतीय संघाने बुधवारी वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ६७ धावांनी बाजी मारली आणि ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेवर २-१ ने कब्जा केला. भारताच्या या दमदार विजयानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ट्विट करून संघाचे कौतुक केले.
भारतीय संघाच्या विजयावर गांगुली यांनी आपल्या ट्विटद्वारे सांगितलं की, 'भारतीय क्रिकेट संघ विंडीजविरुद्धची टी-२० मालिका जिंकणार, हे माहीत होते. त्याप्रमाणे भारतीय संघाने विजय मिळवला देखील. यात काही आश्चर्यांची गोष्ट नाही. पण संघातील प्रमुख फलंदाजांनी आपला नैसर्गिक खेळ करीत संघाला विजयी केले. कोणताही खेळाडू संघातील जागा टिकवण्याच्या हेतूने खेळला नाही. याचा आनंद आहे. वेल डन इंडिया.'
दरम्यान, भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २० षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात २४० धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत विंडीजला १७३ धावांमध्ये रोखलं. या सामन्यात भारतीय सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी १३५ धावा जोडल्या. या दरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.