चेन्नई- वेस्ट इंडीजचा फलंदाज शेमरॉन हेटमायरने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजीची पिसे काढली. त्याने भारतीय गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. हेटमायरने १०६ चेंडूत ११ चौकार आणि ७ षटकारांसह १३९ धावा केल्या. या खेळी दरम्यान, त्याने रवींद्र जडेजाच्या चेंडूवर मारलेला षटकार पाहून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही हतबल झालेला पाहायला मिळाला.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यर (७०) आणि ऋषभ पंत (७१) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विंडीजला २८८ धावांचे आव्हान दिले. तेव्हा विंडीजची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सुनील अम्ब्रीस बाद झाल्यानंतर शेमरॉन हेटमायरने शाई होपच्या साथीने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. हेटमायरने १०६ चेंडूत १३९ धावा केल्या. याचसोबत दुसऱ्या विकेटसाठी हेटमायरने शाई होपसोबत द्विशतकी भागीदारीही केली.