चेन्नई - भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विंडीज फलंदाज शेमरॉन हेटमायरने १३९ धावांची दणकेबाज खेळी केली. याच खेळीच्या जोरावर विंडीजने हा सामना ८ गडी राखून जिंकला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. हेटमायरने या सामन्यात भारतीय गोलंदाजीची पिसे काढली. महत्वाचे म्हणजे, त्याने ७ षटकारांपैकी ३ षटकार रवींद्र जडेजाच्या फिरकीवर लगावले.
आकडेवारी पहिल्यास हेटमायर जडेजासाठी कर्दनकाळ ठरला असल्याचे दिसून येते. हेटमायरने भारत दौऱ्यात आतापर्यंत ४ सामन्यात १७ षटकार ठोकले आहेत. यातील ९ षटकार त्याने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर लगावले आहे. दरम्यान, जडेजा टी-२० क्रिकेटमध्ये 'चालाख' गोलंदाज म्हणून प्रचलित आहे. मात्र, हेटमायर विरुद्ध तो सपशेल अपयशी ठरल्याचे दिसते.
एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात हेटमायरने १०६ चेंडूत १३९ धावांची खेळी केली. उभय संघात झालेल्या टी-२० मालिकेतही हेटमायरने लक्ष वेधले होते. त्याने ३ सामन्यात खेळताना ४० च्या सरासरीने १२० धावा केल्या. विशेष बाब म्हणजे, हेटमायर विंडीजकडून टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.