मुंबई - बांगलादेशला टी-२० आणि कसोटी मालिकेत धूळ चारल्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडीज विरुध्द दोन हात करणार आहे. उभय संघात ३ सामन्यांची टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार आहे. टी-२० मालिकेला ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारताचा सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाली आहे. यामुळे तो या संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. शिखरच्या ठिकाणी आता संजू सॅमसनला संघात स्थान मिळाले आहे.
शिखर धवनला सय्यद मुस्ताक अली स्पर्धेदरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. यामुळे तो विडींज विरुध्दची मालिका खेळू शकणार नाही. शिखर तंदुरुस्त होणार नसल्याने, संजू सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
बांगलादेश विरुध्दच्या टी-२० मालिकेसाठी संजू सॅमसन भारतीय संघात होता. मात्र, त्याला एकाही सामन्यात अंतिम ११ मध्ये संधी मिळाली नाही. यानंतर विडींज विरुध्दच्या मालिकेसाठी संजूची संभाव्य संघात निवड झाली नाही. मात्र, आता शिखरच्या दुखापतीमुळे तो संघात परतला आहे. दरम्यान, विजय हजारे स्पर्धेत संजू सॅमसनने द्विशतकी खेळी करत निवड समितीचे लक्ष वेधले होते.