महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 9, 2019, 6:06 PM IST

ETV Bharat / sports

IND vs WI: विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या पराभवाची 'ही' ठरली कारणे...

अंतिम आणि निर्णायक सामना ११ डिसेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाची कारणे कोणती आहेत ते वाचा...

IND vs WI
IND vs WI: विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या पराभवाची 'ही' ठरली कारणे...

तिरुवनंतरपुरम - वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघ पराभूत होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. विडींजने दुसऱ्या सामन्यात ज्या पद्धतीने खेळ केला, तो कौतूकास्पदच आहे. स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि आंद्रे रसेल यांचा समावेश नसला तरी विडींजचा संघ भारतीय संघावर वरचढ ठरला आणि तीन सामन्याच्या मालिकेत १-१ बरोबरी साधली. आता अंतिम आणि निर्णायक सामना ११ डिसेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाची कारणे कोणती आहेत ते वाचा...

भारतीय संघाची खराब फलंदाजी -
विडींज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शिवम दुबे (५४) आणि ऋषभ पंत (३३) वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर विराटही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. विराट बाद झाल्यानंतर मधली फळी कोसळली. यामुळे भारतीय संघाने कशीबशी १७० धावांपर्यंत मजल मारली. जर भारतीय संघाला आणखी २० धावा जोडता आल्या असत्या तर सामन्याचा निकाल कदाचित वेगळा ठरु शकला असता.

वेस्ट इंडीजची सलीमी जोडी भारताला ठरली मारक -
भारतीय संघ १७० धावांचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरला. मात्र, वेस्ट इंडीजची सलामी जोडी लेंडल सिमन्स आणि एव्हिन लुईस यांनी ७३ धावांची सलामी दिली. सिमन्सने ६७ तर लुईसने ४० धावा जोडल्या. भारतीय संघ यामुळे विंडीजवर दबाव निर्माण करु शकला नाही. डावाच्या सुरूवातीला भारताला विंडीजचे दोन गडी बाद करुन दबाव निर्माण करता आला नाही. हेही भारताच्या पराभवाचे एक कारण ठरले.

निकोलस पूरनची दणकेबाज खेळी -
भारतीय गोलंदाज वेस्ट इंडीजचे लुईस आणि हेटमायर यांना बाद केल्यानंतर विंडीजवर दबाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात होते. तेव्हा निकोलस पूरनने आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. त्याने भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत १८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३८ धावांची खेळी केली. एका बाजू पकडून सलामीवीर सिमन्स स्थिरावलेला होता. त्याने ४५ चेंडूत ६७ धावांची नाबाद खेळी केली. सिमन्स आणि पूरनची जोडी फोडण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आले. यामुळे भारतीय संघ प्रतिकार करु शकला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details