तिरुवनंतरपुरम - ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेला भारत आणि वेस्ट इंडीज संघातील दुसरा टी-२० सामना विडींजने ८ गडी राखून जिंकला. या सामन्यात भारताकडून अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबेने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत अर्धशतकी खेळी केली. त्याला या सामन्यात फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली होती.
शिवमला या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याची विराटची रणनिती पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र, या योजनेमागील कारण विराटने सामन्यानंतर स्पष्ट केले.
विराट म्हणाला, 'आम्ही ग्रिनफिल्डची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करेल, असे गृहीत धरले होते. यामुळे आम्ही आमच्या रणनितीमध्ये ऐनवेळी बदल केला आणि शिवमला लवकर फलंदाजीसाठी पाठवलं. त्याला फिरकीपटूंवर आक्रमण करण्यास सांगितले. ही योजना यशस्वी ठरली.'
शिवमने तिसऱ्या क्रमाकांवर बढती मिळाल्यानंतर ३० चेंडूत ५४ धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक ठरले. शिवमने कर्णधार विराट कोहलीसह तिसऱ्या गड्यासाठी ४१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही रचली.