विशाखापट्टणम - वेस्ट इंडीज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला. त्याला विंडीज कर्णधार केरॉन पोलार्डने रोस्टन चेजकडे झेल देण्यास भाग पाडलं. दरम्यान, विराट एकदिवसीय सामन्यात तब्बल ७ वर्षानंतर पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला आहे. यापूर्वी तो २०१३ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात 'गोल्डन डक'वर बाद झाला होता.
विराट कोहली आपल्या ११ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत, आतापर्यंत एकदिवसीय सामन्यात ११ वेळा शून्यावर बाद झाला आहे. यात तो आजपर्यंत ३ वेळा पहिल्याच चेंडूवर तंबूत माघारी परतला. यापूर्वी २०१३ मध्ये धर्मशाला येथे इंग्लंडविरुद्ध गोल्डन डकवर बाद झाला होता. तत्पूर्वी २०११ मध्ये विंडीजविरुद्ध त्याला पहिल्याच चेंडूवर बाद व्हावे लागले होते.
भारत आणि वेस्ट इंडीज संघात दुसरा एकदिवसीय सामना विशाखापट्टणमच्या मैदानात खेळला जात आहे. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा सलामीवीर रोहित शर्मा (१५९) आणि केएल राहुल (१०२) यांच्या द्विशतकी भागिदारीच्या जोरावर भारतीय संघाने विंडीजसमोर ३८७ धावांचा डोंगर उभारला आहे. दरम्यान, उभय संघात तीन सामन्यांची मालिका सुरू असून पहिला सामना विंडीजने जिंकला आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली.