पुणे - श्रीलंकाविरुद्धची टी-२० मालिका भारतीय संघाने जिंकली. उभय संघात ३ सामन्याची मालिका खेळण्यात आली. यात भारताने २-० ने बाजी मारली. दरम्यान, तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघात विराटने तीन मोठे बदल केले. यात विराटने ऋषभ पंतला डच्चू देत अखेर संजू सॅमसनला संघात जागा दिली.
संजूला अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी तब्बल ५ वर्षे वाट पाहावी लागली. त्याने आपला अखेरचा सामना १९ जुलै २०१५ मध्ये झिम्बाम्वेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर भारताने ७३ टी-२० सामने खेळले. पण यात सॅमसनला संधी मिळाली नाही. हा त्याच्या नावावर झालेला एक अजब रेकॉर्ड आहे.
सॅमसन गेले ८ टी-२० सामने संघात असूनही त्याला एकदाही भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. ऋषभ पंतचा फॉर्म खास नसला तरी विराटने संजूला संघात जागा दिली नाही. त्यावरून अनेक दिग्गजांनी विराटवर टीका केली होती. मात्र, तिसऱ्या सामन्यात सॅमसनला संधी देण्यात आली.