नवी दिल्ली - महेंद्रसिंह धोनी संघात नसल्याने त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने, खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे काम करावे, अशी अपेक्षा संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांची आहे. सध्य स्थितीत संघात अनुभवी धोनी नसल्याने, त्याच्या ठिकाणी ऋषभ पंत यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहे. मात्र, विराट कोहलीला पंतकडून म्हणावी तशी मदत मिळत नाही. यामुळे उपकर्णधार रोहित शर्माची मदत कर्णधार कोहली घेऊ इच्छित आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, धोनीच्या अनुपस्थित रोहित शर्माला धोनीच्या अनुभवाची कसर भरुन काढण्यासाठी संघ व्यवस्थापनाने मदत मागितली आहे. मैदानात काहीवेळा झटपट निर्णय घेण्याची आवश्यकता असते. रोहितने अशावेळी तरुण खेळाडूंशी बोलून, चर्चा करुन त्यांना मदत करावी, अशी अपेक्षा संघ व्यवस्थापनाची आहे.
हेही वाचा -टीम इंडियाला जबर धक्का, 'या' हुकमी गोलंदाजाची कसोटी मालिकेतून माघार
संघामध्ये समतोल राखण्यासाठी कर्णधाराला एका अनुभवी खेळाडूची गरज असते. धोनी संघात असताना, कोहली आणि धोनी हे तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करायचे. मात्र, सध्या धोनी भारतीय संघात नसल्यामुळे रोहितने आपल्या अनुभवाचा फायदा संघातील तरुण खेळाडूंना करुन द्यावा, असे सर्वांचे मत आहे.
दरम्यान, यापूर्वी रोहित शर्मा अनेक वेळा सामन्यात गोलंदाजांना मार्गदर्शन करताना दिसून आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या आफ्रिकेविरुध्दच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तो गोलंदाजांशी चर्चा करताना दिसला होता. प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात रणनिती आखण्यात येणाऱ्या ग्रुपमध्ये रोहित शर्मा महत्वाचा खेळाडू आहे. तसेच प्रशिक्षक रवी शास्त्री आणि विराट कोहली यांचा रोहितवर विश्वास आहे. यामुळे ही जबाबदारी रोहितने पार पाडवी, असे संघ व्यवस्थापनाला वाटत आहे.
हेही वाचा -'लव्ह यू ऋषभ...!' तरुणीच्या 'दिल की बात'वर पंतने काय केले वाचा...
रोहितच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ३ विजेतेपद मिळवली आहेत. विराटच्या अनुपस्थितीत रोहितने भारतीय संघाचं नेतृत्व करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. दरम्यान, रोहितला आफ्रिकेविरुध्दच्या टी-२० मालिकेत फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. यानंतर २ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतही रोहित शर्मा सलामीला फलंदाजीला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मालिकेत रोहित शर्माच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.