मोहाली - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना भारताने ७ गडी राखून जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, या सामन्यात दोन अप्रतिम झेल खेळाडूंनी पकडले. या झेलचीच चर्चा आता सोशल मीडियात रंगली आहे.
आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने विरोधी संघाचा कर्णधार क्विंटन डी कॉकचा अप्रतिम झेल घेतला. क्विंटन डी कॉकने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. तो वेगाने धावा जमवण्याच्या प्रयत्नात होता. तेव्हा नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने त्याचा अप्रतिम झेल घेतला.
हेही वाचा -IND VS SA : हवेत सूर मारुन कर्णधार कोहलीने घेतला 'विराट' झेल, पाहा व्हिडिओ
त्यानंतर आफ्रिकेने भारतासमोर १५० धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना १२ व्या षटकात भारतीय फलंदाज शिखर धवनचा अविश्वनीय झेल डेविड मिलरने घेतला. शम्सीच्या गोलंदाजीवर धवनने टोलावलेला चेंडू सीमापार करणार, असे वाटत असताना मिलरने सीमारेषेजवळ त्याचा उत्कृष्ठ झेल घेतला. हा झेल पाहून प्रेक्षकच नाही तर विराट आणि धवनही आवाक झाले.
हेही वाचा -विराटने साधली शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी, आफ्रिदी म्हणतो...
एकाच सामन्यात दोन अप्रतिम झेल पाहून चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मिलरच्या 'त्या' झेलवर, तो अविश्वसनीय झेल होता. मी आणि विराट अचंबितच झालो. मी चेंडू खूप जोरात मारला होता, त्याच्या प्रयत्नांने मला खूप कौतुक वाटले, अशा शब्दांत शिखर धवनने मिलरचे कौतुक केले आहे.