धर्मशाळा - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्याच्या एकदिवसीय मालिकेला उद्या (ता. १२) पासून सुरुवात होत आहे. धर्मशाळा येथे पहिला सामना खेळवला जाणार आहे. पण, जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे सावट या सामन्यासह संपूर्ण मालिकेवर आहे. या व्हायरसचा धसका भारतीय क्रिकेट संघानेही घेतला असून, गोलंदाजांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
चेंडूला चमक आणण्यासाठी गोलंदाज आपल्या थुंकीचा वापर करतात. हे आपण अनेकदा पाहिले असेल. पण, यंदा कोरोनाच्या भीतीमुळे भारतीय गोलंदाज ही कृती करणे शक्यतो टाळणार आहेत. अशी माहिती भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
दरम्यान, याआधी दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय खेळाडूशी हस्तांदोलन टाळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. धर्मशाळा येथील मैदानावरही कोरोना पासून वाचण्यासाठी काय करावे, यासाठीचे मार्गदर्शन करणारे फलक लावण्यात आले आहेत.