धर्मशाला- भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये आजपासून टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी बरेच सामने आपल्या फिरकीच्या बळावर गाजवणाऱ्या कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना भारतीय १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. दोघांना मालिकेसाठी का घेण्यात आले नाही, याचे स्पष्टीकरण भारतीय कर्णधार विराट कोहलीने दिले आहे.
हेही वाचा -'अॅशेसमध्ये डेव्हिड वार्नर सपशेल 'फेल' ठरला तरी तो संघात असायला हवा'
धर्मशाला येथे होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी विराट कोहलीने पत्रकारांशी बातचित केली. यामध्ये त्याने कुलदीप आणि चहल यांच्या निवडीविषयी भाष्य केले. यावेळी तो म्हणाला, 'दोन कारणाने कुलदीप आणि चहल यांना संघात देण्यात आलेले नाही. पहिले म्हणजे, शेवटच्या गड्यापर्यंत फलंदाजी वाढवण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रथम श्रेणी आणि आयपीएलमध्ये मागील दोन वर्षांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच इतर अनेक संघाची फलंदाजी ९ आणि १० क्रमांकापर्यंत असते, आपली का नाही.' असेही विराट यानं सांगितले.
'दुसरे कारण, आम्ही जे काही निर्णय घेत आहोत ते आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा डोळ्यापुढे ठेवून घेत आहोत. आमचा संघ संतुलित आणि सर्वोत्तम कसा होईल, हे पाहण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. संघामध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. या युवा खेळाडूंना संधी देऊन आम्ही त्यांची कामगिरी पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाडूंची चाचपण करण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत.' असेही विराट म्हणाला. दरम्यान, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलला संघात स्थान न मिळाल्याने, अनेक दिग्गज क्रिकेटपटूंसह, चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
हेही वाचा -IND vs SA T-२० : सामन्यापूर्वी पावसाची हजेरी, क्रीडाप्रेमींची चिंता वाढली