विशाखापट्टणम- कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यादांच सलामीवीर म्हणून मैदानात उतलेल्या रोहित शर्माने दोनही डावात शतक ठोकत सलामीवीराचा दावा मजबूत केला. रोहितने या सामन्यात दणकेबाज खेळी करुन अनेक विक्रम मोडीत काढले. मात्र, याच सामन्यात रोहितच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला आहे.
रोहित शर्माने आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात पहिल्या डावात १७६ धावांची खेळी केली. रोहित आणि मयांक अग्रवालच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ५०२ धावा केल्या. दुसऱ्या डावातही रोहितने आपली लय कायम ठेवत आक्रमक १२७ धावा चोपल्या. दुसऱ्या डावात १० चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने रोहितने ही खेळी साकारली. रोहितच्या झंझावत समोर आफ्रिकेचे गोलंदाज हतबल ठरले.
कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर या नात्याने रोहितचे पदार्पण दणकेबाज ठरले. मात्र, दोनही डावात आश्वासक खेळी करुनही रोहितच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. तो विक्रम म्हणजे, यष्टीचीतच्या रुपाने बाद होण्याचा. कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावांत यष्टीचीत होणारा रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.