विशाखापट्टणम- भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना विशाखापट्टणमच्या के.वाई.एस राजशेखर रेड्डी मैदानावर रंगला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा भारतीय सलामीवीर मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा या जोडीने आफ्रिकेच्या गोलंदाजीची पिसे काढली. दोघांनी त्रिशतकी सलामी देत आफ्रिकेला बॅकफूटवर टाकले.
रोहित आणि मयांक या जोडीने त्रिशतकी भागिदारी रचत १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. दोघांनी भारताचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर या जोडीचा विक्रम मोडला. आफ्रिकेविरुद्ध सेहवाग आणि गंभीर या जोडीने २००४ साली कानपूर येथे झालेल्या सामन्यात २१८ धावांची सलामी दिली होती. हा विक्रम आज रोहित-मयांक या जोडीने मोडला.
याचबरोबर रोहित-मयांक जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक भागीदारीचा विक्रमही आपल्या नावे केला आहे. राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग यांनी २००८ साली २६८ धावांची भागीदारी केली होती. रोहित-मयांक जोडीने हा विक्रमही मोडत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.