नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेविरुध्द २ ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला विश्रांती देत वृध्दीमान साहाला संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे रोहित शर्माला सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली आहे. दरम्यान, रोहित शर्माला या कसोटीपूर्वी झालेल्या सराव सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्याला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. रोहितच्या या प्रकरणावर भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या पहिल्या कसोटीपूर्वी झालेल्या ३ दिवसीय सराव सामना रोहित शर्मासाठी मोठी संधी मानली जात होती. या सामन्यात रोहित दमदार कामगिरी करेल अशी आपेक्षा व्यक्त करण्यात येत होत्या. मात्र, या सामन्यात रोहित शर्मा शून्य धावावर बाद झाला. यानंतर क्रिकेट विश्वातून रोहितच्या सलामीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यावर मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, रोहितला स्थिरावण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे.