नवी दिल्ली - भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसी कसोटी फलंदाजीच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. विराट लवकरच कसोटी क्रमवारीत अव्वलस्थान काबीज करेल, असे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथने विराटचे अव्वलस्थान काबीज केले होते. मात्र, आफ्रिकेविरुध्दच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात विराट क्रमवारीत सर्वोच्च स्थान गाठणार हे जवळपास पक्के आहे.
विराट कोहलीने आफ्रिकेविरुध्दच्या पुण्यातील कसोटी सामन्यात नाबाद द्विशतकी खेळी केली. याचा फायदा विराटला कसोटी क्रमवारीत झाला. आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली असून त्यात विराट दुसऱ्या स्थानी कायम आहे. मात्र, त्याने स्टिव्ह स्मिथमधील गुणांचे अंतर कमी केले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या नाबाद २५४ धावांच्या खेळीनंतर, विराटने ३७ गुणांची कमाई करत, गुणांची धावसंख्या ९०० पार केली. दरम्यान, सद्य स्थितीत स्टिव्ह स्मिथ या क्रमवारीत अव्वलस्थानी असून त्याची गुणसंख्या ९३७ इतकी आहे. तर विराटची गुणसंख्या आफ्रिकेविरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर ९३६ झाली आहे. विराट आणि स्मिथ यांच्यात फक्त एका गुणांचा फरक असून तिसऱ्या कसोटीत विराट स्मिथला मागे टाकत अव्वलस्थान काबीज करेल.