धर्मशाळा - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्याच्या मालिकेला उद्या (ता. १२ ) पासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना धर्मशाळा येथे खेळला जाणार आहे. पण, या सामन्याला कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
धर्मशाळा स्टेडियमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे प्रेक्षकांनी या सामन्याला पाठ फिरवली आहे. मैदानातील कॉर्पोरेट बॉक्स देखील रिकामे आहेत. मैदानात १२ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. यापैकी ९ कॉर्पोरेट बॉक्स रिकामे आहेत.'
दरम्यान, एका बॉक्समध्ये १२ जण बसू शकतात. या बॉक्सच्या तिकिटाची किंमत २ लाख इतकी आहे. धर्मशाळा स्टेडियममध्ये २२ हजार प्रेक्षक सामना पाहू शकतात. पण पहिल्या सामन्याची ४० टक्के तिकिटांची विक्री देखील झालेली नाही, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.