हॅमिल्टन - रॉस टेलरच्या नाबाद झंझावती शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ४ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह यजमान संघाने ३ सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. दरम्यान, या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश केला. त्याने या सामन्यात दोन रन-आऊट केले. याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरचे शतक आणि कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या खेळीच्या जोरावर भारताने ५० षटकात ३४७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी अर्धशतकी सलामी दिली. गुप्टील बाद झाल्यानंतर काही वेळाने टॉम ब्लंडलही स्वस्तात माघारी परतला. तेव्हा हेन्री निकोलस आणि रॉस टेलर यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला.
हेन्री आणि टेलर यांच्यात ६२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी झाली. हेन्री खेळपट्टीवर जम बसवल्यामुळे भारताला ही जोडी डोकेदुखी ठरणार अशी चिन्ह दिसत होती. मात्र जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर एक धाव घेताना निर्माण झालेल्या गोंधळात विराटने हेन्रीला हवेत सूर मारत धाव बाद केले. विराटच्या या अफलातून रन-आऊटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हेन्रीने ८२ चेंडूत ११ चौकारांसह ७८ धावांची खेळी केली.