वेलिंग्टन- न्यूझीलंड दौऱ्यातील पाचव्या टी-२० सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांचा एक फोटो आयसीसीने शेअर केला होता. या फोटोत दोघेही पाण्याच्या बाटल्या घेऊन वॉटर बॉय झालेले दिसले. या दोघांव्यतिरिक्त या फोटोत ऋषभ पंतही होता. सोशल मीडीयावर हा फोटो व्हायरल झाला तेव्हा यावर नेटीझन्सनी वेगवेगळ्या कमेंटही केल्या होत्या. दरम्यान दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा होती हा प्रश्न नेटीझन्सना होता. आता खुद्द विराटनेच त्यावेळी काय चर्चा सुरू होती हे सांगितलं आहे.
न्यूझीलंड-भारत यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात केन विल्यमसन दुखापतीमुळे खेळू शकला नाही. तर भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात विश्रांती घेतली होती. पण दोघेही मैदानात आपल्या संघातील खेळाडूंसाठी वॉटर बॉयच्या भूमिकेत दिसून आले. सामन्यादरम्यान पंत आणि ते दोघे सीमारेषेबाहेर निवांत गप्पा मारताना दिसून आले. या गप्पा कोणत्या विषयावर होत्या याचा उलघडा विराटने वेलिंग्टमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या भेटीदम्यान केला.
विराट म्हणाला, 'न्यूझीलंडचा संघ आपल्या मृदू स्वभावामुळे ओळखला जातो. मी आणि केन विल्यमसन त्या सामन्यादरम्यान जेव्हा सीमारेषेबाहेर बसलो होते. तेव्हा आम्ही क्रिकेट विषयी नाही तर खासगी आयुष्यावर चर्चा करत होतो.'
दरम्यान भारत-न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला २१ फेब्रवारीपासून सुरूवात होणार आहे. पहिला कसोटी सामना २१ ते २५ फेब्रुवारी या काळात वेलिंग्टन येथे खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च दरम्यान ख्राईस्टचर्च येथे होणार आहे. दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ४ वाजता सुरु होणार आहेत.