हॅमिल्टन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना रोमांचक ठरला. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत २० षटकात ५ बाद १७९ धावा केल्या आणि न्यूझीलंड संघाला विजयासाठी १८० धावांचे लक्ष्य मिळाले. यजमान न्यूझीलंडने सुरुवात देखील चांगली केली. पण मध्यावर त्यांचा डाव कोसळला. तेव्हा कर्णधार केन विल्यम्सनने डाव सावरला. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. न्यूझीलंडला शेवटच्या षटकात ६ चेंडूत ९ धावांची गरज होती. तेव्हा मोहम्मद शमीच्या अव्वल गोलंदाजीमुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
शमीने शेवटच्या षटकातील ६ चेंडूत सामना टाय केला. सुपर ओव्हरमध्ये भलेही रोहित शर्माने, दोन चेंडूत सलग दोन षटकार ठोकत सामना जिंकून दिला. मात्र, शमीची गोलंदाजी नेहमीच क्रिकेट चाहत्यांच्या आठवणीत राहिल. वाचा शमीने टाकलेल्या शेवटच्या षटकाचा थरार...
मोहम्मद शमी २० वे षटक घेऊन गोलंदाजीसाठी आला. त्याने पहिला चेंडू यार्कर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो चेंडू थेट फुलटॉस गेला आणि रॉस टेलरने या चेंडूवर षटकार ठोकत ६ धावा वसूल केल्या. न्यूझीलंडला विजयासाठी ५ चेंडूत ३ धावांची गरज होती. शमीने तेव्हा दुसरा चेंडू यार्कर लाईनवर टाकला. टेलरला या चेंडूवर एक धाव मिळाली. शमीने तिसरा चेंडू बाऊंसर टाकला हा चेंडू कर्णधार केन विल्यम्सनला खेळता आला नाही. तो त्या चेंडूला कट करण्याच्या नादात बॅटची कड घेऊन गेलेला झेल यष्टीरक्षक केएल राहुलने घेतला.