हॅमिल्टन - भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध ३४७ धावांचा डोंगर उभारूनही विजय मिळवता आला नाही. न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरने नाबाद शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान, या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी केलेला स्वैर मारा, हेच पराभवाचे मुख्य कारण ठरले.
भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात तब्बल २४ चेंडू वाईड टाकले. यात सर्वाधिक १३ वाईट चेंडू जसप्रीत बुमराहने टाकले. त्याच्यानंतर मोहम्मद शमीने ७, शार्दुल ठाकरू २ तर रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १-१ चेंडू वाईड टाकला. या सर्वांची बेरीज केल्यास भारतीय संघाने न्यूझीलंडला २४ धावा बहाल केल्या.
तसेच या सामन्यात शार्दुल ठाकूरने एक चेंडू नोबॉल टाकला. या चेंडूवर रॉस टेलरने सहा धावा वसूल केल्या. टेलर-लाथम जोडीने शार्दुलने टाकलेल्या त्या ३९ व्या षटकात २२ धावा चोपल्या.
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना मार्टिन गुप्टील आणि हेन्री निकोलस यांनी अर्धशतकी सलामी दिली. संघाची धावसंख्या ८५ असताना गुप्टील (३२) बाद झाला. त्याला शार्दुल ठाकूरने केदार जाधवकरवी झेलबाद केले. टॉम ब्लंडल आणि हेन्रीने न्यूझीलंडला शंभरी गाठून दिली.कुलदीप यादवने ब्लंडलला माघारी धाडत भारताला दुसरे यश मिळवून दिले. हेन्री-टेलर या जोडीने न्यूझीलंडचा डाव सावरला. यादरम्यान, हेन्रीने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो व्यक्तिगत ७८ धावांवर असताना त्याला विराटने धावबाद केले.