माउंट माउंगानुई - न्यूझीलंडने तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना ५ गडी राखून जिंकला आणि तीन सामन्याच्या मालिकेत भारताला ३-० ने व्हाईटवॉश दिले. अखेरच्या सामन्यात भारताने दिलेले २९७ धावांचे आव्हान न्यूझीलंडने ४७.१ षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. न्यूझीलंडने टी-२० मालिकेत झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे.
भारताच्या २९७ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात चांगली झाली. सलामीवीर मार्टिन गुप्टिल आणि हेन्री निकोलस यांनी १०२ धावांची सलामी दिली. चहलने भारताला गुप्टिलच्या रुपाने पहिले यश मिळवून दिले. गुप्टिलने ४६ चेंडूत सहा चौकार आणि चार षटकाराच्या जोरावर ६६ धावा केल्या. त्यानंतर केन विल्यमसन आणि निकोलस या जोडीने ५० धावांची भागिदारी करत न्यूझीलंडला दीडशे पार केले. केन विल्यमसन चहलच्या चेंडूवर बाद झाला. त्याने ३१ चेंडूत २२ धावा केल्या. विल्यमसननंतर काही धावातच अनुभवी रॉस टेलर माघारी परतला. त्याला रवींद्र जडेजाने विराट कोहलीकरवी झेलबाद केले.
निकोलसने एक बाजू पकडून अर्धशतक पूर्ण केले. त्याची खेळी शार्दुल ठाकूरने संपुष्टात आणली. निकोलसने ९ चौकारांच्या जोरावर ८० धावा केल्या. त्यानंतर टॉम लाथम आणि जिम्मी नीशम यांनी न्यूझीलंडला विजयासमीप नेले. चहलच्या गोलंदाजीवर नीशम १९ धावांवर माघारी परतला.
अखेरीस टॉम लाथम आणि कॉलिन ग्रँडहोम यांनी नाबाद ८० धावांची भागिदारी रचत संघाला विजय मिळवून दिला. ग्रँडहोमने २८ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारासह ५८ धावा झोडपल्या. तर लाथम ३२ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून चहलने ३ तर शार्दुल आणि जडेजा यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
तत्पूर्वी, सलग तिसऱ्या सामन्यातही भारताची आघाडीची फळी अपयशी ठरली. तेव्हा मधल्या फळीतील श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या जोडीने भारताचा डाव सावरला. राहुलचे शतक (११२) आणि त्याला श्रेयस अय्यरने (६२) अर्धशतकी खेळी करत दिलेल्या भक्कम साथीच्या जोरावर भारताने भारताने ५० षटकात ७ बाद २९६ धावा केल्या होत्या.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर मयांक अगरवाल (१) आणि विराट कोहली (९) स्वस्तात माघारी परतले. तेव्हा पृथ्वी शॉने श्रेयस अय्यरसह काही काळ डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रेयस अय्यरसोबत चुकलेल्या ताळमेळने त्याची विकेट पडली.
पृथ्वी ४२ चेंडूत ४० धावा करून धावबाद झाला. भारताचे तीन फलंदाज ६२ धावांवर माघारी परतले. तेव्हा श्रेयस आणि केएल राहुल यांनी भारताचा डाव सावरला. राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. यादरम्यान श्रेयसने आपले अर्धशतक पूर्ण केले. तो मोठा फटका मारण्याच्या नादात ग्रँडहोमकडे झेल देऊन बसला. त्याने ६३ चेंडूत ९ चौकार आणि १ षटकारासह ६२ धावांची खेळी केली.
राहुलने यानंतर मनीष पांडेच्या साथीने फटकेबाजी करत शतक झळकावले. मात्र अखेरच्या षटकांमध्ये धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात राहुल हमिश बेनेटच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ११३ चेंडूत ११२ धावांची खेळी केली. यात त्याने ९ चौकार आणि दोन षटकार लगावले. राहुल पाठोपाठ मनीष पांडेही ४२ धावांवर माघारी परतला. अखेरीस तळातल्या फलंदाजांनी भारताला २९६ धावांपर्यंत मजल मारुन दिली. न्यूझीलंडकडून हमिश बेनेटने सर्वाधीक ४ बळी घेतले. जेमिन्सन आणि नीशम यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.