मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह याला अंतिम संघात खेळवू नये असे, मत भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर असून या दौऱ्यात उभय संघात ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे.
गंभीरने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा कालावधी पाहून बुमराहवर ताण पडू नये, असे सांगत आपले मत व्यक्त केले आहे. गंभीर म्हणाला, ,'जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटीत खेळवतील की नाही याबाबत खात्री नाही. पण, भारतीय संघाने त्याला विश्रांती द्यायला हवी. पिंक बॉल कसोटीसाठी तो संघात असायला हवा. तिसऱ्या कसोटीत तो एक्स फॅक्टर ठरू शकतो.'
'बुमराहला तुम्ही दीर्घ स्पेल टाकायला लावू नका. त्याला सातत्याने गोलंदाजी करायला लावल्यास, त्याच्यावरील ताण वाढत जाईल. या मालिकेचा कालावधी लक्षात घेता, त्याला विश्रांती द्यायला हवी. अन्यथा भारतीय संघासमोरील अडचणीत वाढ होईल, असेही गंभीर म्हणाला.