अहमदाबाद -चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव आणि २५ धावांनी पराभव केला. या सामन्यासोबतच भारताने चार सामन्यांची ही कसोटी मालिका ३-१ ने जिंकत, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे तिकिट मिळवले.
भारताने पहिल्या डावात १६० धावांची आघाडी घेतल्यानंतर मैदानात उतरलेला इंग्लंडचा संघ, दुसऱ्या डावात देखील भारतीय फिरकीच्या जाळ्यात अडकला. आर अश्विन आणि अक्षर पटेल या जोडीने प्रत्येकी पाच विकेट घेत भारताला डावाने विजय मिळवून दिला. पहिल्या डावात शतक झळकावणारा ऋषभ पंत सामनावीर ठरला. तर अश्विनला मालिकावीरच्या पुरस्कराने गौरविण्यात आले.
चहापानानंतर मैदानात उतरताच अश्विनने त्यांच्या पहिल्याच षटकात इंग्लंडला दोन धक्क दिले. त्याने पहिल्यांदा क्रॉलीची विकेट घेतली. त्यानंतर आलेल्या ब्रेअरस्टोवला तर त्याने खातेही उघडू दिले नाही. अश्विनने रोहित शर्माच्या हाती त्याला झेलबाद केलं. यानंतर अक्षरने सिब्ले आणि बेन स्टोक्सची विकेट घेतली. यानंतर अश्विन आणि अक्षरने जो रुट आणि पोपची विकेट घेत इंग्लंडला पराभवाच्या खायीत ढकलले. याच फिरकी जोडीने इंग्लंडचे शेपूट देखील स्वस्तात गुंडाळले.