अहमदाबाद - नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. इंग्लंडच्या फिरकी माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव १४५ धावांत आटोपला. जॅक लीच आणि जो रुट या दोघांनी भारताचे ९ गडी बाद केले. रोहित शर्माचा (६६) अपवाद वगळता एकाही भारतीय खेळाडूला आपल्या लौकिकास साजेशा खेळ करता आला नाही. पहिल्या डावांत भारतीय संघाला फक्त ३३ धावांची आघाडी मिळाली आहे.
पहिल्या दिवसाच्या ३ बाद ९९ धावांवरून भारतीय संघाने आजच्या खेळाला प्रारंभ केला. भारताची नाबाद जोडी रोहित शर्मा-अजिंक्य रहाणे यांनी सावध केला. भारताने पहिल्या डावात २ धावांची मिळवली. तेव्हा जॅक लीचने अजिंक्य रहाणेला (७) पायचित करत भारताला जबर धक्का दिला. त्यानंतर पुढच्याच षटकात लीचने रोहितला पायचित करत इंग्लंडला मोठी विकेट मिळवून दिली. रोहित ९६ चेंडूंत ११ चौकारांसह ६६ धावांवर माघारी परतला.