अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना बुधवारपासून अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. हा सामना दिवस-रात्र सामना असून या सामन्याचा आज गुरुवारी (२५ फेब्रुवारी) दुसरा दिवस आहे. या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव ३०.४ षटकांत ८१ धावांवर संपुष्टात आला आहे. तसेच भारताने पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी घेतल्याने भारतासमोर आता हा सामना जिंकण्यासाठी ४९ धावांचे आव्हान आहे. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ५, तर आर अश्विनने ४ विकेट्स घेतल्या. तसेच वॉशिंग्टन सुंदरला १ विकेट मिळाली.
दुसऱ्या दिवशी भारताला १४५ धावांवर ऑलआऊट केल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला. मात्र इंग्लंडच्या डावाची सुरुवात खुपच खराब झाली. पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलने इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रावलीला शून्यावर क्लिन बोल्ड केले. याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर अक्षरने जॉनी बेअरस्टोला माघारी धाडलं. त्यामुळे इंग्लंडची अवस्था पहिल्या ३ चेंडूतच २ बाद ० धावा अशी झाली होती.