चेन्नई - एम. ए चिदंबरण स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ५७८ धावांचा डोंगर उभारला. तेव्हा भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. इंग्लंडच्या माऱ्यासमोर भारताची आघाडीची फळी कोसळली. चहापानपर्यंत शंभर धावसंख्येच्या आत भारताचे ४ फलंदाज माघारी परतले. यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या जोडीने भारताचा डाव सावरला. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जो रुटने अजिंक्य रहाणेचा अप्रतिम झेल टिपला. रुटने टिपलेला झेल पाहून फलंदाज रहाणे देखील अवाक झाला.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने सलामी जोडी स्वस्तात बाद झाली. त्यापाठोपाठ कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेचीही विकेट लवकर गमावली. रोहित शर्मा 6, शुबमन गिल 29, कर्णधार विराट कोहली 11 आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे 1 धाव करून बाद झाला.
रहाणे डोम बेसच्या चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार जो रूटकडे झेलबाद देऊन बसला. रहाणेचा जबरदस्त झेल रूटने डावीकडे उडी घेत पकडला. त्याने अविश्वसनीय झेल घेत सर्वानाच स्तब्ध केले.