चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी एक नकोसा विक्रम आपल्या नावे केला आहे. भारताकडून एका डावात सर्वाधिक 'नोबॉल' टाकण्याची नकोशी कामगिरी गोलंदाजांनी केली.
भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या पहिल्या डावात एकूण २० नोबॉल टाकले. जे भारताकडून आतापर्यंत सर्वाधिक आहेत. यात जसप्रीत बुमराहने ७, शाहबाज नदीमने ६ तर इशांत शर्माने ५ नोबॉल टाकले. तर उर्वरित दोन नोबॉल रविचंद्रन अश्विनने टाकले आहेत.
भारतीय संघाने याआधी कसोटीच्या एका डावात १६ नोबॉल फेकले होते. २०१० साली श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाने ही नकोसी कामगिरी केली होती. दरम्यान, एका डावात सर्वाधिक नोबॉल टाकण्याचा नकोसा विश्वविक्रम श्रीलंका संघाच्या नावे आहे. श्रीलंका संघाने २०१४ मध्ये बांग्लादेशविरुद्ध २१ नो बॉल टाकण्याचा पराक्रम केला होता.