मुंबई -बांगलादेश विरुध्द २ सामन्यांची कसोटी मालिका भारताने २-० ने जिंकली. या मालिकेतील दुसरा व ऐतिहासिक दिवस-रात्र सामन्यात भारताने अवघ्या अडीच दिवसात विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृध्दीमान साहाच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. यामुळे त्याच्यावर शस्रक्रिया करण्यात आली आहे. याची माहिती बीसीसीआयने दिली.
बांगलादेशविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात साहाच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्या दुखापतीची चाचणी केल्यावर बोटाला फ्रॅक्चर असल्याचे दिसून आले. तेव्हा बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. त्यासाठी साहा मुंबईत आला असून त्याच्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली.