कोलकाता- भारत आणि बांगलादेश संघातील ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी कोलकाता शहर गुलाबी रंगाने न्हाऊन निघाले आहे. शहरात दिवसभर या दिवस-रात्र सामन्यांचीच चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान, उभय संघातील हा सामना सुरू होण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. दिवस-रात्र कसोटीत गोलंदाजीत फिरकी आणि वेगवान गोलंदाजात कोण जास्त यशस्वी ठरले आहे, वाचा काय आहे रेकॉर्ड...
दिवस-रात्र कसोटीत गोलंदाजांना मदत मिळते, असे तज्ञांचे मत आहे. आतापर्यंत ११ दिवस-रात्र कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. भारत-बांगलादेश यांच्यातील हा १२ वा सामनाठरणार आहे. दिवस-रात्र कसोटीत नेहमीच वेगवान गोलंदाजांचा बोलबाला रहिला आहे. आतापर्यंत झालेल्या ११ सामन्यात वेगवान गोलंदाजांनी एकूण २५७ गडी बाद केले आहेत. तर ९५ गडी बाद करण्यात फिरकी गोलंदाजांना यश आले आहे.
भारत-बांगलादेश संघातील सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. कारण भारतीय संघ सर्वच आघाड्यावर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघ भारतीय संघासमोर कमकुवत दिसत आहे. गोलंदाजीचा विचार केल्यास भारताकडे मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश यादव हे त्रिकूट वेगवान मारा करण्यास उत्सुक आहे. तर फिरकीत रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, आर. अश्विन यासारखे पर्याय भारताकडे आहेत.