इंदूर - भारत आणि बांगलादेश संघामध्ये पहिला कसोटी सामना इंदूरच्या होळकर मैदानात रंगला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार मोमिनुलच्या हा निर्णय बांगलादेशच्या अंगलट आला. भारतीय गोलंदाजीसमोर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १५० धावांत आटोपला. भारतीय खेळाडूंनी पहिल्या डावात ५ झेल सोडले. तरी या संधीचा फायदा बांगलादेशी खेळाडूंना उचलता आला नाही.
भारताची वेगवान तिकडी शमी, इशांत आणि उमेश यांनी बांगलादेशी फलंदाजीची धूळदाण उडवली. तिघांनी मिळून ८ गडी बाद केले. भारताकडून पहिल्या डावात सर्वाधिक ३ गडी मोहम्मद शमीने बाद केले. तर अश्विन, इशांत शर्मा आणि उमेश यादवने प्रत्येकी दोन गडी बाद केले.