सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला उद्या (गुरूवार ता. ७) पासून सुरूवात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज टी नटराजन याचा समावेश निश्चित असल्याचे संकेत मिळत आहेत. टी नटराजन याने एक ट्विट केले आहे. या ट्विटवरून हा अंदाज लावला जात आहे.
टी नटराजन याने आयपीएल २०२० मध्ये दमदार कामगिरी नोंदवली. यामुळे त्याची निवड ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नेट गोलंदाज म्हणून करण्यात आली. दौऱ्यादरम्यान, संघाचे प्रमुख गोलंदाज दुखापती झाले. यामुळे नटराजनला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. टी-२० मालिकेत त्याने ६ गडी बाद करत आपली उपयुक्तता सिद्ध केली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात उमेश यादव जखमी झाला. यामुळे उर्वरीत दोन कसोटी सामन्यासाठी टी नटराजन यांचा समावेश भारतीय संघात करण्यात आला. अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी नटराजनला सैनी आणि शार्दूल ठाकूर यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे. असे असले तरी, तो तिसऱ्या कसोटीतून पदार्पण करणार असल्याचे संकेत आहेत.