मुंबई- भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेला १४ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. पण, मालिका सुरू होण्याआधीच भारतीय संघ व्यवस्थापनापुढे सलामीला नेमकं कोणाला पाठवायचे, हा पेच निर्माण झाला आहे. कारण, श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत सलामीवर रोहित शर्माने विश्रांती घेतली होती. तेव्हा या मालिकेत शिखर धवन आणि लोकेश राहुल यांना सलामी करण्याची संधी मिळाली होती. या दोघांनीही दमदार सलामी दिली.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत शिखर आणि लोकेश यांनी भारताला चांगली सुरूवात दिली. तिसऱ्या टी-२० सामन्यात तर दोघांनी पहिल्या गड्यासाठी ९७ धावांची भागिदारी केली. दोघांनी या सामन्यात अनुक्रमे ५२ आणि ५४ धावा केल्या. मात्र, आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माची निवड संघात करण्यात आली आहे. त्यामुळे सलामीला कोण येणार, हे अद्याप स्पष्ट नाही.
भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी याबाबत सांगितले की, 'श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेमध्ये रोहित शर्मा खेळला नव्हता. पण तो चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहितला पहिली पसंती देण्यात येईल. पण रोहितबरोबर नेमका कोणता फलंदाज सलामीला येईल, याबाबत सध्या व्यवस्थापन विचार करत आहे.