ब्रिस्बेन - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ब्रिस्बेन येथे सुरु असलेला अखेरचा चौथा कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात उपहारापर्यंत ४ गड्यांच्या मोबदल्यात १४९ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडे सध्या १८२ धावांची आघाडी आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर जोडीने आक्रमक पावित्रा घेतला. डावखुरा डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस यांनी तुफानी फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. शार्दुलने हॅरिसला (३८) एका उसळत्या चेंडूवर पंतकरवी झेलबाद केले. त्यानंतर सुंदरने पुढच्याच षटकात डेव्हिड वॉर्नरला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. डेव्हिड वॉर्नरने ४८ धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागिदारी रचली.
ऑस्ट्रेलियाची अवस्था २४ षटकात बिनबाद ८८ वरून दोन बाद ९१ अशी झाली. त्यानंतर मोहम्मद सिराजने एकाच षटकात धोकादाक मार्नस लाबुशेन आणि मॅथ्यू वेड यांना बाद करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियानं ३५ षटकांत ३.६८ च्या जबरदस्त सरासरीने १२८ धावा चोपल्या. भारतीय गोलंदाजांनीही चार बळी घेत सामन्यात पुनरागमन केले. सध्या स्टिव्ह स्मिथ २८ आणि कॅमरुन ग्रीन ४ धावांवर खेळत आहेत.