मुंबई- भारतीय संघाने श्रीलंकाविरुद्धची टी-२० मालिका जिंकून २०२० वर्षाची सुरूवात धडाकेबाज केली. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. उभय संघात होणाऱ्या या मालिकेतील पहिला सामना आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्यासाठी उत्सुक आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय डावाची सुरूवात रोहित शर्मासोबत केएल राहुल करणार की शिखर धवन करणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, हे तिघेही अंतिम ११ मध्ये असण्याची शक्यता कर्णधार विराट कोहलीने बोलून दाखवली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शिखर धवनचा रेकॉर्ड चांगला आहे. यामुळे विराट त्याला अंतिम संघात घेण्यास इच्छुक असल्याचे दिसते. शिखर संघात सामिल झाल्यास विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. विराटनंतर श्रेयस अय्यरचा नंबर लागण्याची शक्यता आहे.
भारतीय गोलंदाजीची कमान जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांच्याकडे आहे. त्यांना कुलदीप किंवा युझवेंद्र चहलच्या फिरकीची साथ असणार आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघही फुल्ल फॉर्मात आहे. कारण ऑस्ट्रेलियाने मायदेशात खेळताना, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघाचा सुपडासाफ केला आहे.
भारताविरुद्धच्या मालिकेत मार्नस लाबुशेनची निवड करण्यात आली आहे. सद्या तो फॉर्मात असल्याने, ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरोन फिंचसाठी तो हुकमी एक्का ठरु शकतो. लाबुशेनसोबत, स्टिव्ह स्मिथ, एलेक्स कॅरी आणि अॅरोन फिंच चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत. गोलंदाजीत पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आमि जोश हेझलवूड ही तिकडी भारतासाठी डोकेदुखी ठरु शकते.
सामन्याची वेळ - दुपारी १:३० वाजता
- भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद शमी.
- ऑस्ट्रेलियाचा संघ -
- अॅरोन फिंच ( कर्णधार), डी'आर्सी शॉर्ट, अॅश्टन अॅगर, अॅलेक्स करी ( यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लॅबुश्चॅग्ने, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅश्टन टर्नर, डेव्हीड वॉर्नर आणि अॅडम झम्पा.