ब्रिस्बेन - सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि ऋषभ पंत (नाबाद ८५) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ३ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत २-१ ने बाजी मारली. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव पहिल्या कसोटी सामन्यानंतर मालिकेतून माघार घेतली. त्यानंतर प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले, अशा कठीण परिस्थितीत अजिंक्यने मोठ्या कौशल्याने सहकाऱ्यांना सोबत घेऊन एकजुटीने कांगारूंचा सामना केला आणि इतिहास घडवला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी ९ गडी बाद करत ऑस्ट्रेलियाला २९४ धावांवर रोखले आणि भारताला विजयासाठी ३२८ धावांचे लक्ष्य मिळाले. भारतीय संघाने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचे लक्ष्य पार केले.