बंगळुरू- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिकेतील तिसरा व अखेरच्या निर्णायक सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आज खेळवण्यात येणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत आहे. यामुळे दोनही संघ मालिका विजयाच्या उद्देशानं समोरासमोर भिडतील. दरम्यान, या सामन्यासाठी अमर-अकबर-अँथनी अंतिम संघात असतील. भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवने, भारताचे अमर अकबर अँथनी कोण आहेत, याचा खुलासा केला आहे.
भारतीय संघाने राजकोटच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघासमोर ३४० धावांचे आव्हान ठेवले. यात भारतीय सलामीवीर शिखर धवन, कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांनी अर्धशतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाला भारताचे ३४१ धावांचे आव्हान झेपले नाही. त्यांचा संपूर्ण संघ ३०४ धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताने हा सामना ३६ धावांनी जिंकला. आता अंतिम निर्णायक सामन्याला बंगळुरूच्या मैदानात काही तासातच सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी कुलदीपने एक फोटो शेअर केला आहे. याला त्याने अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि ऋषी कपूर यांच्या अभिनयाने सजलेल्या, अमर अकबर अॅन्थनी या चित्रपटातील गाण्याचे बोल, कॅप्शन म्हणून दिले आहे.