मेलबर्न - बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९५ धावांमध्ये गुंडाळत आश्वासक सुरूवात केली. जसप्रीत बुमराह ४ आणि रविचंद्रन अश्विनने ३ गडी बाद करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले. त्यांना पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजने २ गडी बाद करत मोलाची साथ दिली. यादरम्यान, सिराजची एक छोटी मुलाखत व्हायरल होत आहे. यात सिराज हैदराबादी ढंगात बोलताना पाहायला मिळत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने कसोटी पदार्पण केले. खडतर परिस्थितीवर मात करत सिराजने आपले भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न साकार केले. आज त्याने २ गडी टिपले. या कामगिरीनंतर भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी सिराज यांची एक छोटी मुलाखत घेतली. यात श्रीधर यांनी सिराजला हैदराबादी ढंगामध्ये प्रश्न विचारले. तेव्हा यावर सिराजने देखील त्याच ढंगात उत्तरे दिली. हा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
श्रीधर यांनी सिराजला विचारले की, पदार्पण केल्यानंतर तुझ्या काय भावना होत्या. यावर सिराज म्हणाला, भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळायला मिळणे हे माझे स्वप्न होते. ते पूर्ण झाल्याचे पाहून मला आनंद झाला. मी संघासाठी १०० टक्के द्यायचे ठरवलं होतं. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि जसप्रीत बुमराह हे दोघेही माझ्याशी सतत संवाद साधत होते, त्यांच्यामुळे मला योग्य प्रकारे गोलंदाजी करण्यास मदत झाली.'