अहमदाबाद - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने फिटनेस चाचणी पास केली आहे. तो उर्वरित दोन कसोटीसाठी भारतीय संघात असणार आहे, याची माहिती बीसीसीआयने ट्विटद्वारे दिली.
उमेश यादवला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मेलबर्न कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. त्यांचे मांसपेशी ताणले गेले होते. यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. बंगळुरू येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते.
इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी उमेश यादवची निवड भारतीय संघात करण्यात आली होती. पण, त्याआधी त्याला फिटनेस चाचणी अनिर्वाय करण्यात आली होती. उमेश यादवने ती फिटनेस चाचणी पास केली आहे. यामुळे त्याचा भारतीय संघात खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
३३ वर्षीय उमेश यादवने ३३ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलं आहे. यात त्याने ३०.५४ च्या सरासरीने १४८ विकेट घेतल्या आहेत. इंग्लंड विरुद्ध उमेशने ७ कसोटी सामने खेळली आहेत. यात त्याच्या नावे १५ विकेट आहेत.